(मुंबई)
ऑगस्ट महिन्यात श्रुती रोहित जमदाडे या पती रोहित जमदाडे यांच्यासोबत दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्या वेळी परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. दुचाकीवर बसण्यापूर्वी छत्री उघडण्याचा प्रयत्न करत असताना वाऱ्याच्या झोतामुळे श्रुती यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या.
या अपघातात श्रुती यांच्या डोक्यातील नाजूक भागाला त्यांच्या केसातील क्लिप जोरात लागली. डोक्याला गंभीर मार लागल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले आणि अवघ्या काही तासांत क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी साधारण श्रुती शुद्धीवर आल्या, मात्र केवळ बोटांची किरकोळ हालचाल जाणवत होती.
पाच महिन्यांपासून बेशुद्ध अवस्था
अपघातानंतर गेल्या पाच महिन्यांपासून श्रुती बेशुद्ध अवस्थेत आहेत. या काळात त्यांना अनेक गंभीर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले. उपचारादरम्यान त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला, त्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर 9 लाख रुपयांहून अधिक खर्च झाला असून पुढील उपचारांसाठी आणखी मोठ्या खर्चाची गरज आहे.
पतीची सावलीसारखी साथ
या कठीण काळात पती रोहित जमदाडे श्रुती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून ते सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. लग्नात दिलेल्या वचनांप्रमाणे रोहित यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ श्रुतींची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दैनंदिन उपचारांपासून ते देखभालीपर्यंत सर्व जबाबदारी रोहित स्वतः पार पाडत आहेत. डॉक्टरांकडून अद्याप ठोस निष्कर्ष मिळाला नसला तरी रोहित यांचा विश्वास आहे की, श्रुती या परिस्थितीवर मात करून पुन्हा उभ्या राहतील.
पुनर्वसनासाठी मदतीचे आवाहन
श्रुती यांच्या पुढील उपचारांसाठी त्यांना पुनर्वसन केंद्रात (Rehabilitation Centre) दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे श्रुती जमदाडे यांच्या पुढील उपचारांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सहकार्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.

