( मुंबई )
कोकणातील मनसेचे ज्येष्ठ नेते आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी खेडेकर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे कोकणात कमळाची ताकद आणखी वाढली आहे.
वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलला गेला होता. प्रत्येक वेळी चर्चा रंगत असतानाच काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आज झालेल्या या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
खेडेकर हे मनसेचे जुन्या पिढीतील आणि कोकणातील प्रभावी नेते मानले जातात. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, मागील काही काळात त्यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाची तयारी सुरू होती. पक्षप्रवेश विलंबित होत असल्याने ‘भाजप त्यांना झुलवत आहे का?’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला. या प्रवेशाकडे केवळ वैयक्तिक राजकीय पुनरागमन म्हणून नव्हे, तर कोकणात भाजपची संघटना अधिक बळकट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना खेडेकर म्हणाले, “पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखं नाही. तुम्ही माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी नक्की सांगेन. माझ्या देवाने मला दूर केलं, काही कारणं असतील, पण त्या दुराव्याचं दुःख आहे. आता मात्र भाजप वाढवण्यावरच आमचा पूर्ण भर असेल. मनसेतील अनेक सहकाऱ्यांशी भावनिक नाती होती, ती थांबत असल्याचं दुःख आहे; पण भाजपनं मला आपलंसं केल्याचा आनंदही तितकाच आहे.”

