( मुंबई )
मुंबईमध्ये ड्रग्जविरोधातील कारवाईला वेग आला असून, अंधेरी परिसरात उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडले आहे. नेस्को कंपाऊंडमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, तपास यंत्रणांनी पश्चिम उपनगरात सुरू असलेली एक मोठी ड्रग्ज फॅक्टरी उध्वस्त केली आहे.
अंधेरी पूर्व येथील सहार रोड परिसरात अवघ्या 13 हजार रुपये मासिक भाड्याच्या छोट्याशा खोलीतून एमडी (सिंथेटिक ड्रग्स) तयार करून कोट्यवधींचा व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. भास्कर चाळीत भाड्याने घेतलेल्या या खोलीत आरोपींनी संपूर्ण सेटअप उभारला होता आणि दिवस-रात्र ड्रग्ज निर्मिती सुरू होती. स्थानिक पातळीवर विक्री टाळून बाहेरील राज्यांमध्ये सप्लाय केल्यामुळे हा प्रकार दीर्घकाळ पोलिसांच्या नजरेतून सुटला होता.
दरम्यान, खार पोलीस ठाण्याच्या पथकाला गस्तीदरम्यान एक संशयित इसम आढळून आला. त्याच्या झडतीत 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अंधेरीतील खोलीवर छापा टाकत ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, केमिकल्स आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज उत्पादनाचे पुरावे मिळाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (वय 44) याला अटक केली आहे. तो गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला वॉन्टेड आरोपी असून, त्याच्यावर 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमधील एका प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2023 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला आणि मुंबईत येऊन हा ड्रग्ज व्यवसाय सुरू केल्याचे समोर आले आहे.
तपासात त्याची पत्नी नसरीन हिची भूमिका देखील उघड झाली असून, ती या व्यवसायातील आर्थिक व्यवहार सांभाळत होती. पोलिसांनी तिच्या बँक खात्यातील सुमारे 26 लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी रिझवान अहमद लियाकत अली याला प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे.
सध्या मोहम्मद आरिफ याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची रवानगी तेथील कारागृहात करण्यात आली आहे. तर त्याची पत्नी आणि इतर साथीदारांना अंधेरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे समोर येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत अलीकडच्या काळात उघड होत असलेल्या ड्रग्ज प्रकरणांमुळे पोलीस आणि तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, या नेटवर्कचा सखोल तपास सुरू आहे. शहरात वाढत चाललेल्या सिंथेटिक ड्रग्जच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

