(मुंबई / वृत्तसंस्था)
जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणना निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जनगणनेच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीच्या दुसऱ्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील तयारी, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आणि जनजागृती यांचा आढावा घेण्यात आला.
जनगणना 2027 चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणनेचे काम मे-जून 2026 या कालावधीत राज्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या वेळेत नियुक्त्या, प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया, स्व-गणना तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व उपक्रम मार्च 2027 पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी आपल्या कार्ययोजना जनगणनेच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवून कामाचा वेग कायम राखावा, असे राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी नियुक्तीसाठी पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. यामध्ये तहसीलदार, मुख्याधिकारी आणि वॉर्ड अधिकारी यांचा समावेश आहे.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबतही बैठकीत माहिती देण्यात आली. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने 14 ऑगस्ट 2026 रोजी अधिसूचना जारी करून या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या 40 प्रश्नांची यादी निश्चित केली आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात 3 सप्टेंबर 2026 रोजी पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. जनगणनेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवर जनजागृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे राजेश अग्रवाल यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची स्व-गणना करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारे आवाहन करण्यात येणार आहे.
या बैठकीला राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीच्या सदस्य तथा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, त्यातून समोर आलेले महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची माहिती समितीसमोर सादर केली.


