(रायगड)
श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट परिसरात आज पहाटे भारतगॅस कंपनीच्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी अनर्थ टळली असून ट्रक चालक थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी चालक ट्रकमध्ये अडकला होता. मात्र प्रसंगावधान राखत त्याने स्वतः मार्ग काढत ट्रकच्या बाहेर येण्यात यश मिळवले. या घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला मुका मार लागल्याचे समजते.
सर्वात दिलासादायक बाब म्हणजे अपघातानंतर ट्रकमधील कोणत्याही गॅस सिलेंडरला गळती किंवा स्फोट झाला नाही. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

