(चिपळूण)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका काँग्रेसमध्ये मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष प्रकाश नारायण साळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनललक्ष्मी घाग यांच्या शिफारशीनुसार २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची प्रभारी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान तत्कालीन तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत खेर्डी येथील प्रकाश साळवी यांच्याकडे तालुक्याची धुरा सोपवली होती. पक्षाने मोठ्या अपेक्षेने दिलेली जबाबदारी अवघ्या दोन महिन्यांतच सोडल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त होत आहे.
आपल्या राजीनाम्यात प्रकाश साळवी यांनी वैयक्तिक कामकाजामुळे पक्षाच्या जबाबदाऱ्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याचे कारण नमूद केले आहे. प्रभारी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली आहे.
दरम्यान, या राजीनाम्यावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. चिपळूण तालुका काँग्रेसचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार, आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

