(रत्नागिरी / मुंबई)
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसेच कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी भातासह इतर पिके आडवी पडली, तर काही ठिकाणी पिकांसकट शेतीची जमीनच वाहून गेली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून कोकणातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे एकमेव भात पिक पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे. काढणीला आलेली पिके पावसामुळे आडवी पडली असून, त्यांना कोंब फुटले आहेत. पिकात साचलेल्या पाण्यामुळे पिके सडत असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
ते पुढे म्हणतात, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना जशी शासनाने मदत दिली, तशीच मदत कोकणातील शेतकऱ्यांनाही द्यावी. नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक सहाय्य देण्यात यावे. कोकणात भात हे प्रमुख पिक असून, बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह याच पिकावर अवलंबून आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यादेखत वाया गेलं आहे. तरीदेखील कोकणातील शेतकरी कितीही संकटं आली, नुकसान झालं किंवा कर्जबाजारी झाला तरी आत्महत्या करत नाही. म्हणूनच सरकारने या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी पत्राद्वारे केले आहे.
जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, कोकणातील शेतकऱ्यांकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मात्र, यावेळी परिस्थिती गंभीर आहे. म्हणून शासनाने कोकणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे. राज्यातील इतर भागांप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांनाही तातडीची आणि समतोल मदत मिळावी, हीच अपेक्षा आता कोकणातून व्यक्त होत आहे.

