( राजापूर )
राजापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि राजापूर पत्रकार संघाचे सल्लागार महेश शिवलकर यांचा राजापूर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी गौरव करण्यात आला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन महेश शिवलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या वतीने त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
महेश शिवलकर हे गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या परखड लेखणीद्वारे त्यांनी राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शहरातील पुररेषा, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, गाळउपसा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याने पत्रकार संघामध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात शहराच्या विकासासाठी ते प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सत्कार समारंभाला पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर, सदस्य विनोद पवार, भास्कर खडपे, संतोष मोंडे, संतोष शिंदे, प्रकाश वळंजू यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

