(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कार्जिडा गावच्या अंगणवाडी सेविका सौ. चेतना चंद्रकांत शिंदे यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कार्जिडा तसेच पाचल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्जिडा हे गाव राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. अशा भागात गेली तब्बल २६ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करताना सौ. शिंदे यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. लहान मुलांमध्ये शाळा आणि शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून प्रामाणिकपणे काम केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरी आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प राजापूर यांच्या वतीने त्यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकात्मिक प्रकल्प अधिकारी प्रगती लिगम यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सन्मानाबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

