(राजापूर)
राजापूर शहरातील अर्जुना नदी पात्रालगत चिंचबांध जवळील वास्तू हे पुरातन सूर्यमंदिरच असल्याचे विविध दाखल्यांवरून स्पष्ट होत आहे. या मंदिराला आक्रमणापासून वाचविण्यासाठी व्यापक लढा उभारण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना सकल हिंदू समाजात निर्माण झाली आहे. यासाठी २२ ऑगस्ट रोजी राजापूर शिवतीर्थ येथे विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून, या धर्मसभेत सूर्य मंदिराबाबत विस्तृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली. आज (शनिवारी) राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची विस्तृत माहिती देण्यात आली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये अर्जुना नदी काठावरील या वास्तूबाबत मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी सकल हिंदू समाजाने या वास्तूला पुरातन सूर्यमंदिर असल्याचा दावा केला होता. आज झालेल्या पत्रकार परिषदेत हा दावा पुन्हा ठामपणे मांडण्यात आला.
या मंदिराची बांधणी सातवाहन राजवटीतील असल्याचे दिसते. मंदिरावरील शंख, कमळ, भारवाहक हत्ती, फणाधारी नाग, धनुष्य इत्यादी कोरीवकाम ही हिंदू स्थापत्यशैली दर्शवणारी चिन्हे आहेत. अशीच नक्षीकामे धूतपापेश्वर मंदिरातही आढळतात, असे नमूद करण्यात आले. तसेच, या वास्तूसंबंधी सापडलेल्या देवनागरी लिपीतील मराठी-संस्कृत मिश्रभाषेतील शिलालेखामध्ये शालिवाहन शके १७०७ (१४ जून १७८५) रोजी मंदिर दातार वंशातील व्यक्तीने बांधल्याचा उल्लेख आहे.
राजापूरचे ज्येष्ठ नागरिक, निवृत्त शिक्षक आणि स्वातंत्र्यसैनिक कै. प्रभाकर द. मराठे यांनी २०१५ मध्ये लिहिलेल्या “राजापूरचा इतिहास” या पुस्तकातही या वास्तूला सूर्यमंदिर म्हणूनच स्थान दिलेले आहे. अनेक ज्येष्ठ हिंदू नागरिकांनी या मंदिरातील पिंडी व मूर्तीचे दर्शन घेतल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली.
दरम्यान, भारतीय पुरातत्व खात्याकडे मार्च २०२५ मध्ये निवेदन देऊन या वास्तूची पहाणी करून संरक्षित स्मारक दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आजतागायत पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही, यामुळे सकल हिंदू समाज व्यथित झाला आहे.
सकल हिंदू समाजाने आता हे मंदिर वाचवण्यासाठी एकवटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २२ ऑगस्ट २०२५ रोजी राजापूर शिवतीर्थ येथे विराट धर्मसभा होणार असून, त्यामध्ये सूर्य मंदिराबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी मोठी घोषणा करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला सकल हिंदू समाजाचे महेश मयेकर, राजेंद्र कुशे, रमेश गुणे, श्रीकांत ताम्हनकर, विवेक गुरव, संदीप तेरवणकर, दीपक गुरव, निकेश पांचाळ आदी हिंदू बांधव उपस्थित होते.