( रत्नागिरी )
राजापूर तालुक्यातील मूर येथील १७ वर्षीय युवकाला रस्त्यावरून जात असताना डुकराने धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या धडकेत युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यश अनंत साळवी (वय १७, रा. मूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश आणि त्याचा मित्र पार्थ पाष्टे हे दोघेजण सरस्वती विद्यालय पाचल येथे अकरावीच्या प्रवेशासाठी माहिती घेण्यासाठी मूर गावातून पायी जात होते. यावेळी रस्त्यालगतच्या जंगलमय भागातून अचानक डुकराने यशला जोरदार धडक दिली. धक्क्याने यश रस्त्यावर कोसळला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
तत्काळ त्याला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकाराची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली असून घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.