(मुंबई)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन जुने छायाचित्रे पोस्ट करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. “तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते,” अशा शब्दांत त्यांनी आदर व्यक्त केला.
राजकारणासोबतच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेची विशेष आवड होती, असे नमूद करत मोदींनी त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून केलेल्या निर्भय आणि परखड भाष्याचा विशेष उल्लेख केला. “समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय मतप्रदर्शन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी ताकद होती. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,” असेही पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मुंबईतील रीगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे जन्मलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची यंदा जन्मशताब्दी साजरी होत असून, हा दिवस तमाम शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वाचा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्रातून कोट्यवधी मनांमध्ये मराठी अस्मितेचा अभिमान आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार प्रज्वलित करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष तमाम शिवसैनिक आणि मराठीजनांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उत्सवाचे ठरणार आहे. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व वैचारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, आज षण्मुखानंद सभागृहात होणारा विशेष सोहळा सर्वांच्याच लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना तसेच मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
महापालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाल्याने, त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
स्मृतिस्थळी निष्ठा आणि श्रद्धेची वारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत मानले जातात. त्यांच्या जन्मदिनी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होतात. आजही शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेची ही वारी अनुभवता येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थळ: षण्मुखानंद सभागृह, माटुंगा
वेळ: सायंकाळी ६ वाजता
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

