(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड-वाटद-खंडाळा या नेहमीच वर्दळीच्या असलेल्या मार्गावरील सांडे-लावगण येथील कमानीजवळ असलेला स्पीड ब्रेकर सध्या वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी रस्त्यावर पडलेला मोठा खोलगट खड्डा आणि त्यात सातत्याने साचणारे पाणी यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांसाठी हा स्पीड ब्रेकर धोकादायक ठरत असून, येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी रस्त्याचा भाग मोठ्या प्रमाणात खचला असून, त्यामध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्याची खोली वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाही. पाण्याखाली असलेला रस्त्याचा खोलगट भाग अचानक समोर येत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. विशेषतः वेगाने येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अचानक ब्रेक लावावा लागतो. मोठ्या आणि अवजड वाहनांची सततची ये-जा तसेच वारंवार ब्रेक लावण्यामुळे या ठिकाणचा रस्ता अधिकच खराब होऊन खड्डा खोल झाल्याचे दिसून येत आहे.
या मार्गावरून दररोज अनेक वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणची खराब अवस्था केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर परिसरातील नागरिकांसाठीही त्रासदायक ठरत आहे. दुचाकीस्वारांना खड्ड्याचा अंदाज न आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटण्याचा धोका आहे. छोट्या वाहनांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे किंवा रस्त्यावरून वाहून येणारे पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. तसेच रोजच्या प्रवासात या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सांडे-लावगण येथील कमानीजवळील धोकादायक स्पीड ब्रेकरची तातडीने दुरुस्ती करावी. खड्डा बुजवून रस्त्याची पातळी योग्य करावी आणि पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


