(चिपळूण / रत्नागिरी)
रायगड जिल्ह्यातील महाड येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दुचाकीवरून रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने फरार झालेल्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी चिपळूण पोलीस व आरसीपी पथकाने संयुक्त कारवाई करत कामथे येथील जंगल परिसरात चोरट्यांना घेरले. यामध्ये एका चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून दुसरा चोरटा अद्याप घनदाट जंगलात लपून बसल्याने त्याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाड येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून हे चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने रत्नागिरी जिल्ह्याकडे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली तसेच रत्नागिरी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी सतर्कता वाढवून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, हे चोरटे चिपळूणमार्गे सावर्डेच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गनिमी कावा करत दुचाकीची नंबर प्लेट काढून टाकली तसेच अंगावरील कपडेही बदलले. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव अचूक ओळखत पाठलाग सुरूच ठेवला.
अखेर कामथे घाटातील एका ठिकाणी दुचाकी सोडून दोन्ही चोरटे जंगलात पळून गेले. कामथे कदमवाडी व जावळेवाडी परिसरात हे चोरटे दिसताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत यातील एका चोरट्याला पकडून त्याला बेदम चोप देत दोरीने बांधून ठेवले. मात्र दुसऱ्या चोरट्याने ग्रामस्थ व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत जंगलात पळ काढला.
यानंतर कामथे, कदमवाडी आणि जावळेवाडी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पसार झालेल्या चोरट्याचा कसून शोध सुरू आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याला चिपळूण पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या थरारक पाठलागामुळे चिपळूण परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे.

