(चिपळूण)
कुंभार्ली घाटातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. काल 22 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास, खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एक खासगी कार थेट मोठ्या खड्ड्यात जाऊन अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा अपघात गंभीर स्वरूपाचा ठरू शकला असता.
याच ठिकाणी घडलेल्या दुसऱ्या घटनेत, अवघ्या दोन फूट खोल खड्डा चुकवताना एसटीची लालपरी थोडक्यात बचावली. काही क्षणांचा विलंब झाला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. मात्र सध्या या घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांसाठी हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. खासगी वाहने, मालवाहू ट्रक आणि एसटी बस अशा शेकडो वाहनांची दररोज ये-जा या घाटातून होत असते.
काल घडलेल्या घटनेत, कारचालकाने समोर दिसणारा मोठा खड्डा टाळण्याचा प्रयत्न केला असता वाहन थेट दुसऱ्या खोल खड्ड्यात घसरून अडकले, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले होते. मात्र कोणतेही स्पष्ट कारण न देता हे काम अचानक बंद करण्यात आले. काम का थांबवण्यात आले, निधी अडला कुठे, जबाबदार अधिकारी कोण, याबाबत अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून साधी विचारणाही झालेली नाही. ही बाब स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारी आहे.
पावसाळा जवळ येत असताना रस्त्याची ही अवस्था कायम राहिल्यास मोठा अपघात अटळ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कुंभार्ली घाटातील खड्डे बुजवण्याचे काम पुन्हा सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
“अपघात झाल्यानंतर नव्हे, तर अपघात होण्यापूर्वीच कारवाई करा,” अशी मागणी आता कुंभार्ली घाटातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

