(नांदेड)
येथील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर असलेल्या कॅनालमध्ये खेळता-खेळता पडल्याने दोन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव येथील राम राठोड यांच्या मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण (वय ३, रा. बेलखेड, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) ही दिवाळी सणानिमित्त आपल्या माहेरी, म्हणजेच निमगाव येथे आली होती. त्या दिवशी दुपारी श्रावणी आणि तिचा चुलत भाऊ स्वस्तिक सचिन राठोड (वय २ वर्षे ६ महिने) हे दोघे घरासमोरील कॅनाल परिसरात खेळत होते. कॅनालमध्ये साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात दोघेही चुकून पडले. दुर्दैवाने हे कोणाच्या लक्षात आलं नाही.
काही वेळाने मुले घरात न दिसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अनेक तास शोध घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरासमोरील कॅनालकडे पाहणी केली असता, दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले. तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र तेथे उत्तरीय तपासणीची सुविधा नसल्यामुळे दोन्ही बालकांचे मृतदेह नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव गावात आणि बंजारा समाजात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

