( चिपळूण )
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. तब्बल ४८ व्यापारी संकुले व खासगी इमारतींना पार्किंग नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांत सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई आणि जागा सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पार्किंगऐवजी व्यापारी उपयोग; वाहतुकीची वाढती समस्या
अनेक व्यापारी संकुले व इमारतींनी बांधकाम परवान्याच्या अटींनुसार राखीव पार्किंगची जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांचा ताण वाढून वाहतूक कोंडी तीव्र झाली आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रमुख रस्त्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्णय
आगामी गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नगरपालिकेने वेळेवर कठोर भूमिका घेत पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवर धडक कारवाई करण्याचे ठरवले आहे.
७ दिवसांत सुधारणा नाही तर कठोर कारवाई
नोटिसांमध्ये संबंधित संकुलधारकांना सात दिवसांच्या आत योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. ठराविक वेळेत सुधारणा न झाल्यास दंड, जागा सील करणे यांसारख्या कठोर कारवाया करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि महामार्गालगतच्या चौकांवरील प्रचंड वाहनताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने अधिकारी स्वतः पाहणी करून मोहीम राबवण्याचे ठरवले असून, नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

