(चिपळूण /प्रतिनिधी)
‘माझ्या मुलांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हिरावले गेले, माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. आम्ही त्यांचे काय बिघडवले होते? आता आम्हाला केवळ न्याय हवा आहे,’ अशा हळव्या पण ठाम शब्दांत मयत एजाज कुरेशी यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त करत न्यायासाठी आर्त मागणी केली आहे. या घटनेमुळे चिपळूण तालुक्यातील रामपूर परिसरात उघडकीस आलेल्या खूनप्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे.
रामपूर परिसरात सापडलेल्या मानवी हाडांचा डीएनए तपास पूर्ण झाल्यानंतर ती एजाज कुरेशी यांचीच असल्याचे स्पष्ट झाले असून, तपासयंत्रणांच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशाल खोडदेकर आणि जन्नतूननिसा खान या दोघांना अटक केली असून, पैशाच्या वादातून हा खून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी दुकानगाळा दाखविण्याच्या बहाण्याने विशाल खोडदेकर आणि जन्नतूननिसा खान यांनी एजाज कुरेशी यांना घराबाहेर बोलावून घेतले. दिवसभर कुरेशी हे त्यांच्या संपर्कात होते; मात्र रात्री अचानक त्यांच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संशय अधिक गडद झाला.
यानंतर कुटुंबीयांनी स्वतः मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला असता जन्नतूननिसा खान हिचे लोकेशन चिपळूणमधील एका फार्महाऊसवर दिसून आले. या माहितीच्या आधारे कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर मालाड आणि चिपळूण पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली आणि तपासाची दिशा निर्णायकरीत्या बदलली. कुरेशी यांच्या पत्नीने भावनिक स्वरात सांगितले की, ‘दोघेही एकमेकांच्या निकट संपर्कात होते आणि त्यांनी अत्यंत क्रूरपणे माझ्या पतीची हत्या केली. त्यांनी स्वतःही ते मान्य केले आहे. माझ्या लहान मुलांचे भविष्य अंधारात ढकलले गेले. आता आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे.’
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीबाबत कुटुंबीयांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. एजाज कुरेशी हे मुंबईतील मालाड परिसरात इस्टेट एजंट म्हणून कार्यरत होते. पगडी पद्धतीने फ्लॅट आणि दुकानगाळ्यांच्या व्यवहारात ते मध्यस्थ म्हणून काम करत असत. जन्नतूननिसा खान हिने घेतलेल्या फ्लॅट व्यवहारातही कुरेशी हे केवळ समन्वयक होते; त्यांनी कोणतीही थेट आर्थिक देवाणघेवाण केलेली नव्हती, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. या खूनप्रकरणामागील नेमका हेतू, आर्थिक वादाचे स्वरूप आणि आरोपींची संपूर्ण भूमिका याचा उलगडा करण्यासाठी पोलिस तपास अधिक सखोल करण्यात येत असून, पुढील काही दिवसांत महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

