(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. ही घडामोड आमदार भास्कर जाधव यांच्या प्रभावक्षेत्रात झाल्याने ‘उबाठा’ गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे संदीप सावंत यांचे नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे नंतर वहाळ जिल्हा परिषद गट हा राजकीय प्रतिष्ठेचा मानला जातो. गुहागर विधानसभा मतदारसंघात येणारा हा गट भास्कर जाधव यांचा गड समजला जातो. मात्र यावेळी संदीप सावंत यांनी थेट त्या गडावरच घाव घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावंत हे जनतेशी थेट संवाद साधणारे, सर्वसामान्यांच्या संपर्कात राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकतेच पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार सुभाष बने यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले असून, आता उबाठा गटातील प्रमुख मोहरे आपल्या बाजूला खेचण्यात यश मिळवले आहे.
शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील रत्नागिरी दौऱ्यादरम्यान, वहाळ गटातील पुढील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला – कळंबट शाखाप्रमुख बाबुराव घाणेकर, मुर्तवडे शाखाप्रमुख अशोक पांचाळ, कळंबट-घवाळगाव शाखाप्रमुख संदीप निर्मळ, तोंडली शाखाप्रमुख दिलीप कांबळे, वीर शाखाप्रमुख अंकुश घेवडे, कळंबट उपशाखाप्रमुख महेश पिलवलकर, मुर्तवडे उपशाखाप्रमुख दीपक पांचाळ, कळंबट केंद्रप्रमुख महेश काटदरे, कळंबट बूथप्रमुख विश्वनाथ शिरकर, वीर बूथप्रमुख पांडुरंग दुर्गुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पक्षात सामील झाले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहमंत्री योगेश कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार राजन साळवी, उपनेते संजय कदम, राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि संदीप सावंत यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
नेत्यांनी या पक्षप्रवेशासाठी संदीप सावंत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आपल्या गटात येत आहेत, ही संदीप सावंत यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे,” असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
‘वहाळवर भगवा फडकवणार’ — संदीप सावंत
“वहाळ गटात कामांपेक्षा दादागिरी आणि दबावाचे राजकारण सुरू होते. मी मात्र नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहिलो. त्यामुळेच लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. आता जे कार्यकर्ते पक्षात आले आहेत, त्यांचा विश्वास मी कायम राखणार. जो येईल त्याला सोबत घेईन आणि जो येणार नाही त्याच्याशिवायही वहाळ गटावर भगवा फडकवणार,” असा ठाम निर्धार संदीप सावंत यांनी व्यक्त केला.

