(चिपळूण / प्रतिनिधी)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात येत्या १ व २ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या लख्ख चांदण्याच्या प्रकाशात वन्यप्राण्यांची विशेष प्रगणना हाती घेतली जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमींना वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या गूढ शांततेत, पाणवठ्यांवर तहान भागवण्यासाठी येणाऱ्या तृणभक्षी व हिंस्र प्राण्यांचे निरीक्षण करण्याची दुर्मीळ संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.
या प्रगणनेद्वारे व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचे अस्तित्व, त्यांच्या संख्येतील चढ-उतार तसेच लुप्तप्राय प्रजातींची नोंद घेण्यात येणार आहे. विशेषतः वाघांच्या संख्येचा अंदाज बांधण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम निर्णायक ठरणार आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची काटेकोर तयारी करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी १ व २ मे रोजी कोअर, बफर तसेच नियमित पर्यटन क्षेत्र पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर प्रगणनेदरम्यान अग्निप्रतिबंधक उपाययोजना व शिकार प्रतिबंधक गस्त यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडे हमीपत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे. जंगलातील अनपेक्षित घटनांसंदर्भात शासन किंवा वनविभाग जबाबदार राहणार नसल्याची स्पष्ट कल्पना सहभागींना देण्यात येणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वन्यजीवांचे जवळून निरीक्षण करण्याची दुर्मीळ संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम केवळ रोमांचक अनुभव देणारा नसून, वन्यजीव संवर्धनाच्या व्यापक प्रयत्नांमध्ये मोलाची भर घालणारा ठरणार आहे.

