(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नगरपालिकेतील शौचालय दुरुस्ती कामातील कथित अनियमिततेच्या फाईलवरून गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी नगर परिषदेत सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात झालेल्या तीव्र शाब्दिक वादानंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय व प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२१ मध्ये स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील शौचालयांच्या दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कामांवरील खर्च, निविदा प्रक्रिया आणि कामांचे तपशील (बायफर्केशन) जाणून घेण्यासाठी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर गुरुवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास अभियंता रोहन डांगे यांच्या कक्षात गेले होते. आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित कागदपत्रे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तिवरेकर आणि डांगे यांच्यात चर्चा सुरू असतानाच तेथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप करत वादाला तोंड फोडले. यानंतर दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी गंभीर आरोप केले. “मी जाधव यांच्याशी संवाद साधत नव्हतो. तरीही त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली,” असा आरोप त्यांनी केला.
पालिकेतील कारभारात पारदर्शकता यावी आणि गैरप्रकार उघडकीस यावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असून भ्रष्टाचारात गुंतलेल्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यामुळेच असा प्रकार घडला असावा, असे मत तिवरेकर यांनी व्यक्त केले. रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराच्या राजकीय व प्रशासकीय परंपरेला हे वर्तन शोभणारे नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या वेळी नगरपालिकेतील कर्मचारी, शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर तसेच अन्य सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते. या घटनेचा सत्ताधारी महायुतीतील सर्व नगरसेवकांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि नगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सत्ताधारी गटाने स्पष्ट केले. या प्रकरणाचे पडसाद आता आगामी सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्षांना झालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ येत्या सभेत अभियंता यतीराज जाधव यांच्या निलंबनाचा ठराव मांडून कडक कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

