(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील अनधिकृत अतिक्रमणांबाबत कोणतीही तडजोड न करण्याची ठाम भूमिका रत्नागिरी नगरपरिषदेने घेतली आहे. त्यानुसार कोकण नगर परिसरातील रस्त्याकडेला असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी शुक्रवारपासून कडक कारवाई सुरू करण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही मोहीम रत्नागिरी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणार असल्याची माहिती नगर अभियंता यतिराज जाधव यांनी दिली.
नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. या सभेत शहरातील के. सी. जैन नगर परिसरातील विकास योजनेत मंजूर असलेल्या रस्त्यावर उभारलेले सहा पत्र्याचे गाळे चर्चेचा मुख्य विषय ठरले. या गाळ्यांबाबत गेल्या चार वर्षांत स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी नगरपरिषद तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासक काळात त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र नूतन नगरसेवकांच्या पहिल्याच सभेत या अतिक्रमणांवर ठोस भूमिका घेत, गाळे हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या पत्र्याच्या गाळ्यांमध्ये टेलरिंग, लॉन्ड्री, सलून तसेच इतर व्यावसायिक दुकाने सुरू आहेत. ठराव मंजूर झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील रस्ते, गटारे व फुटपाथवर केलेली अतिक्रमणे स्वयंप्रेरणेने काढून घेण्यासाठी नगरपरिषदेने यापूर्वी जाहीर नोटीस काढली होती. कोकण नगर परिसरातील काही व्यावसायिकांनी त्याला अंशतः प्रतिसाद दिला; मात्र अपेक्षित पूर्ण प्रतिसाद न मिळाल्याने आता पोलिस बंदोबस्तात थेट कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (शुक्रवारी) सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ होणार असून, अतिक्रमणाला कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा निर्धार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

