(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील शीळ येथे २२ वर्षीय विवाहित महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बिमला तपेंद्र बन्योला (वय २२, मूळ रा. चौकुणे, जि. सुरखेत, नेपाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २१) सकाळी सुमारे ९ वाजता बिमला ही नारीस मालीम यांच्या आंब्याच्या बागेत बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिचे पती तपेंद्र बन्योला हे तिला शोधण्यासाठी व बकऱ्या परत आणण्यासाठी बागेत गेले असता, बिमला हिने बागेतील आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

