(खेड)
खेड तालुक्यात रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वनविभागाने प्रभावी कारवाई केली असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ही कारवाई २२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.
मौजे वनपाल खेड व वनरक्षक काडवली हे व्याघ्र गणनेचे काम करत असताना निगडे, ता. खेड बोर्जे सीमेलगत माळरान क्षेत्रात संशयास्पद हालचाली आढळल्या. श्री. राजेश भानुशाली यांच्या मालकीच्या शेतजमिनीत सर्वे नं. ६३/अ मध्ये तीन व्यक्तींनी रानडुकराची शिकार करून मृत अवस्थेत दोन रानडुकर घेऊन जात असल्याचे आढळले. वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
कारवाईदरम्यान बाबू भागोजी शिंदे (रा. माणे, ता. खेड) याला पकडले गेले, तर उर्वरित दोन आरोपी जंगलात पळून गेले. अटक केलेल्या आरोपीची झडती घेतली असता काळ्या पिशवीतून ९६ जिवंत गावठी बॉम्ब तसेच दोन रानडुकरांचे मृत अवशेष आढळले.
बाबू भागोजी शिंदे याला जप्त केलेल्या मुद्देमालासह न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, खेड समोर हजर करण्यात आलेअसता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्री. प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली श्री. प्रकाश पाटील आणि वनपाल खेड श्री. जय भागवत यांनी देखील या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

