(खेड)
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ५३ वर्षीय प्रौढास लोखंडी वस्तूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना खोपी (ता. खेड) येथे घडली. या प्रकरणी दोघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील आत्माराम भोसले (वय ५३, रा. मिरले हुंबरवाडी) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना ११ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास खोपी येथील रोहिदास वाडी पुलाजवळ घडली. फिर्यादी भोसले हे पायी चालत जात असताना आरोपी दिनेश वासुदेव सुतार (रा. मिरले, वडाची वाडी) याने पैशाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. वादावादी दरम्यान, “तुझ्या मोठ्या भावाला जाग्यावर बसवले आहे, तसेच तुलाही बसवेन,” अशा धमकीवजा शब्दांत आरोपीने बोलत भोसले यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जोरदार मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या साथीदारासह संगनमताने रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, “पनवेलला नेऊन ठार मारतो,” अशी धमकीही त्यांनी दिली.
या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खेड पोलिसांनी दिनेश सुतार व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

