( देवरूख )
संगमेश्वर तालुक्यातील धामणी पं.स. गणातून आपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या कुंभारखणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय ५७) यांचा गुरुवारी सकाळी देवरूख येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. गुरुवारी देवरूख तहसीलदार कार्यालयात आलेल्या सर्व अर्जांची छाननी सुरू असताना सुजीत सुर्वे पोर्चबाहेर असताना छातीत जोरदार वेदना जाणवून ते खाली पडले. त्यांना त्वरीत ग्रामीण रुग्णालयात नेले गेले, मात्र डॉक्टरांच्या तपासणीत त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मावस भाऊ अनिल सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संतोष थेराडे, मुन्ना थरवळ, इस्त्याक कापडी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ वाजे, आषिश सुर्वे आणि इतर सहकारी मदतीस आले. तथापि, सर्व प्रयत्न फेल ठरले.
सुजीत सुर्वे यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांची पत्नी, मुले यांचेसह सर्व नातलग मुंबईत असल्याने त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार मुंबईत त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

