(खेड / रत्नागिरी)
पोयनार गावातील गोठणी नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी मुंबईला नेत असताना प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग गणपत डिगे (वय ६२, रा. पोयनार, डिगेवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग डिगे हे १८ सप्टेंबर रोजी पोयनार गावातील गोठणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या दंशामुळे त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती अधिक उपचाराची गरज असल्याने त्यांना मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईकडे नेत असताना त्यांना माठमाठ्याने म्हणजेच त्रासदायक पद्धतीने श्वास घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नातेवाइकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात घडली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोयनार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नदी परिसरात फेरफटका मारताना विशेषतः मधमाशांचे पोळे किंवा त्यांची वस्ती असलेल्या ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


