(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूरमध्ये जमिनीच्या वादातून तोडलेली खैराची २० झाडे चोरी होण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुरादपूर वरचीवाडी येथील ६० वर्षीय बळीराम सिताराम चौगुले आणि पर्शराम गोविंद चौगुले यांच्यात जमीन मालकी हक्काविषयी वाद सुरु होता. हिस्सा नं. ८२/९ मधील जागेत खैराची झाडे तोडून ठेवलेली होती. सरकारी मोजणी आणि मालकी हक्क निश्चित होण्यापूर्वीच आरोपी पर्शराम चौगुले यांनी फिर्यादींच्या संमतीशिवाय ही झाडे चोरून नेली.
ही चोरी २० जानेवारी दुपारी ४ ते २१ जानेवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडल्याचे समजते. चोरलेली झाडांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ६० हजार रुपये असल्याचे अंदाज आहे, प्रत्येक झाडाची किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे.
बळीराम चौगुले यांनी तक्रार केल्यानंतर देवरुख पोलिसांनी आरोपी पर्शराम चौगुले यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

