(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर येथे श्री जाकादेवी मंदिर रनपार व रनपार ग्रामस्थ मंडळ (रत्नागिरी) यांच्या वतीने आयोजित रनपार ते मुंबई पालखी सोहळ्याचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. संगमेश्वर (नावाडी) येथील सुनील यशवंत आंबवकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
२४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सुरू असलेल्या या पालखी सोहळ्याची सुरुवात २४ फेब्रुवारी रोजी रनपार येथील मानकरी जयवंत कीर (खोत), गणेश सुर्वे (खोत) आणि वेदांत तोडणकर (खोत) यांच्या मानाच्या घरातून झाली. रत्नागिरी येथे रमेश श्रीधर कीर व कुवारबाव येथे वैभव विलणकर यांच्याकडे दर्शन घेतल्यानंतर सुमारे ५० ते ६० भाविकांसह पालखी संगमेश्वर येथे पोहोचली.
मनोहारी पालखी नृत्य व पुष्पवृष्टी
सुनील आंबवकर यांनी सपत्नीक देवीची पूजा-अर्चा केली. त्यानंतर पालखीला पुष्पहार अर्पण करून आकर्षक शृंगार करण्यात आला. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. संगमेश्वरमधील युवक व भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात सादर केलेले पालखी नृत्य आणि फटाक्यांची आतशबाजी यामुळे परिसरात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली. हा विलोभनीय सोहळा पाहून उपस्थित भाविक भारावून गेले.
देवीला साकडे व आशीर्वाद
देवीचे पुजारी व मानकऱ्यांनी आरती व आरज करून संगमेश्वरमधील भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, सर्वांना सुख-शांती लाभो, अशी प्रार्थना केली. या संपूर्ण सोहळ्यासाठी सुनील आंबवकर व त्यांच्या परिवाराने विशेष मेहनत घेतली. रात्री ११ वाजता पालखीचा पुढील प्रवास अलिबागच्या दिशेने वाजत-गाजत सुरू झाला.

