(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी वितरित झाला असला, तरी ही कामे नेमकी कोणती, कुठे आणि किती खर्चात होत आहेत याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याची तक्रार वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाने तालुक्यातील सुरू असलेल्या कामांची स्वतंत्र पाहणी मोहीम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी दिलेल्या निवेदनात, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे, नियमबाह्य पद्धती, डांबराचे कमी प्रमाण आणि अधिकाऱ्यांचा अभाव या गंभीर त्रुटी आढळत असल्याचे नमूद केले आहे. काही कामे त्यांच्या हमी-कालावधीपूर्तीपूर्वीच खराब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत असतो. महासंघाने शासन व संबंधित विभागांवर काही महत्त्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केले आहेत. यामध्ये विकासकामांची दर्जेदार अंमलबजावणी ही संबंधित विभागाची जबाबदारी, सर्व योजनांचे फलक त्वरित लावून नागरिकांना माहिती देणे बंधनकारक, कामांच्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य; अनुपस्थिती गंभीर त्रुटी मानली जाईल, निकृष्ट अथवा नियमबाह्य कामे आढळल्यास तात्काळ कामबंदीची कारवाई, सार्वजनिक निधी वाया घालवणाऱ्या दर्जाहीन कामांना मंजुरी अथवा पेमेंट न देण्याचा आग्रह अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
गुरव म्हणाले, डांबर, खडी व इतर साहित्याचा योग्य वापर केला जातो की नाही यावर काटेकोर देखरेख आवश्यक आहे. अनेक वेळा ठेकेदारांकडून मनमानी होताना दिसते; शिवाय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामाचा दर्जा अधिकच संशयास्पद ठरतो. नागरिकांनी स्वतः सतर्क राहून आपल्या गावातील किंवा शहरातील विकासकामांची नियमित पाहणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. कामांमध्ये अनियमितता दिसल्यास व्हिडिओ किंवा फोटोसह 9890747525 या क्रमांकावर माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शक्य असल्यास संबंधित विभागाला थेट कळवणेही गरजेचे असल्याचे गुरव यांनी नमूद केले आहे.
महासंघाने स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमबाह्य पद्धतीने किंवा निकृष्ट पातळीवर होणारी कामे नागरिकांच्या सहकार्याने रोखली जातील; संबंधित विभागाचे अधिकारी त्यासाठी पूर्णपणे जबाबदार धरले जातील. संगमेश्वर तालुक्यातील विकासकामांवर सर्वदूर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, जनतेची जागरूकता आणि विभागांची उत्तरदायित्वबुद्धी हीच योजनेचा दर्जा सुधारण्याची किल्ली ठरणार आहे.

