(मुंबई)
शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवारी रात्री घडली. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, बुधवारी विधान परिषदेत याचे तीव्र पडसाद उमटले.
या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की, “इथे साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय. मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री 9.30 वाजता डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेरडं वाटलं, दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. याआधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली होती. निकृष्ट जेवण घेऊन पार्सल घेऊन गाडीत बसतो. सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटलं” असं ते म्हणाले.
परिषदेत शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार अनिल परब यांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला. “सरकारमधील आमदार बनियान व टॉवेलवर येऊन गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करतो. आमदार कसे वागावेत, याचे काही संकेत असावेत की नाही? हे गल्लीतील लोक आहेत का? सरकारच्या प्रतिमेला यामुळे बट्टा लागत आहे. यांच्यावर बंदोबस्त करा,” अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.
परब यांनी पुढे सरकारवर घणाघात करत विचारले, “अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा घेणार का? अशा लोकांच्या आधारावर सरकार चालणार का?” ते म्हणाले, “आमदार निवास हे विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येते. जर मी विधिमंडळात कुणाला मारहाण केली, तर तुम्ही माझे निलंबन कराल. मग या आमदाराचंही निलंबन करून जनतेला संदेश द्या की, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”
या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. “जेवण निकृष्ट असेल, तर त्याबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया आहे. मात्र, मारहाण करणे पूर्णपणे अयोग्य आहे. यामुळे लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आमदाराविरोधात योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे. अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीतील हा विषय असल्याने संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कॅन्टीन चालकाचा परवाना निलंबित
आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधे निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंटा केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली. या कॅन्टीनमधील पदार्थाची एफडीएने तपासणी केली. त्यानंतर हा परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिका-यांकडून आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमधील संपूर्ण स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल गोळा केले. हे सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. तपासणी दरम्यान स्टोअर रूमचे ऑडिटही करण्यात आले. संपूर्ण अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.