(मुंबई)
मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच ‘थप्पा’ हा भव्य आणि हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची स्टारकास्ट घेऊन हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण आहे स्टारकास्ट?
वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय कलाकार या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. पहिल्यांदाच हे सर्व कलाकार एकाच चित्रपटात स्क्रीन शेअर करत असल्याने नवीन जोडी, नवी केमिस्ट्री आणि ताजेतवाने अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
निर्माते कोण आहेत?
‘थप्पा’ हा चित्रपट स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे यांच्या संयुक्त निर्मितीखाली साकारला जात आहे. मेहुल शाह आणि अमित भानुशाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. फिफ्टी टू फ्रायडे या बॅनरअंतर्गत ‘मुंबई पुणे मुंबई’ मालिकेसह ‘गर्ल्स’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मेहुल शाह यांनी यापूर्वी ‘फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘शिकायतें’ या हिंदी वेब सीरिजचेही निर्मितीकार्य केले आहे.
कथानकाबद्दल उत्सुकता
या चित्रपटाची कथा नेमकी कशावर आधारित आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट एखाद्या प्रेमकथेला उजाळा देणार का, सूड, फसवणूक यामागचे रहस्य उलगडणार का, की काहीतरी वेगळाच ट्विस्ट असेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे ‘थप्पा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

