(पेण)
पेण तालुक्यातील वाशी नाका परिसरात गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी गॅस सिलेंडरने भरलेल्या टाटा टेम्पोला अचानक आग लागून भीषण स्फोटांची मालिका घडली. या आगीत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असून नऊ भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.०६ वाजता वाहन क्रमांक MH 06 BW 0030 (टाटा मेगा एक्सल) हे भारत गॅस वरदान, पेण येथून वडखळ–डोळवी परिसरात ग्राहकांचे गॅस सिलेंडर पोहोचवण्यासाठी निघाले होते. या वाहनाचे चालक व मालक सिद्धार्थ विठोबा ठाकूर (वय ३१, रा. काळेसरी, पोस्ट वढाव) होते. वाहनामध्ये एकूण ५२ सिलेंडर होते, त्यापैकी ४८ भरलेले तर ४ रिकामे होते.
वाहन वाशी नाका येथून पुढे वडखळकडे जात असताना अचानक इंजिन भागातून धूर आणि आग दिसू लागली. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण करत वाहनातील सिलेंडरना वेढले आणि एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले. स्फोटांचा प्रचंड आवाज दूरवर ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
या आगीत भरलेल्या ४८ सिलेंडरपैकी ९ सिलेंडरचा स्फोट झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच वाहनातून उडी घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र सिलेंडरचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडाल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणा करत असून, गॅस वाहतूक करताना आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

