(मुंबई)
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी जावे लागणार असल्याने आता अंगणवाडी सेविकांनी या कामास स्पष्ट नकार दिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने याबाबत अधिकृत भूमिका मांडली असून, महिला व बालविकास विभागाला पत्रही पाठवले आहे.
लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांनी केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. केवायसी प्रक्रियेदरम्यान काही प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे लाभ अडकला असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्यावर अतिरिक्त स्वरूपाचे फिजिकल व्हेरिफिकेशनचे काम टाकू नये. याआधी केलेल्या कामाचे मानधन अद्याप मिळालेले नाही. अनेक सेविकांच्या खात्यात मानधन जमा होण्यास अडचणी येत असून, त्यासाठी त्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
अंगणवाडी सेविकांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरताना त्यांनी प्रत्यक्ष मदत केली आहे. प्रत्येक अर्जामागे ५० रुपये मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आजपर्यंत हे मानधन मिळालेले नाही. काम करूनही पैसे वेळेवर न मिळाल्याने सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
संघटनेने पुढे असेही नमूद केले आहे की, केवायसी प्रक्रियेदरम्यान महिलांचे व्हेरिफिकेशन आधीच झाले आहे. आता पुन्हा प्रत्यक्ष पडताळणीसाठी घरोघरी गेल्यास लाभार्थी महिलांचा विरोध आणि नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची फिजिकल व्हेरिफिकेशनची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकू नये, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
या विषयावर राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभाग काय निर्णय घेतो, याकडे लाभार्थी महिला तसेच अंगणवाडी सेविकांचे लक्ष लागले आहे.

