(मुंबई)
महागड्या घरांच्या बाजारात अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना लवकरच मोठी संधी मिळणार आहे. म्हाडाकडून मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी जाहीर केली जाणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मार्च 2026 मध्ये म्हाडाकडून सुमारे 3000 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. या लॉटरीत मुंबई, पुणे आणि कोकण मंडळातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. लॉटरीची अधिकृत जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल.
वाढत्या घरांच्या किमतींमध्ये मध्यमवर्गाला दिलासा
मुंबई आणि पुण्यातील वाढलेल्या घरांच्या किमतींमुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी घर खरेदी करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाची घरे ही नेहमीच विश्वासार्ह आणि परवडणारा पर्याय मानली जातात. बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात घरे उपलब्ध होत असल्यामुळे म्हाडाच्या लॉटरीला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. यावेळीही विक्रमी अर्ज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकण मंडळात 4000 घरांसाठी स्वतंत्र लॉटरी
मुंबई आणि पुण्याबरोबरच कोकण मंडळाअंतर्गत सुमारे 4000 घरांसाठी स्वतंत्र लॉटरी काढण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर परिसरातील घरांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लॉटरीत विविध उत्पन्न गटांचा समावेश करून नियोजन करण्यात येत आहे.
म्हाडाचे पुनर्विकास प्रकल्प वेगात
म्हाडाचे अनेक महत्त्वाचे पुनर्विकास प्रकल्प सध्या वेगाने प्रगतीपथावर आहेत. यामध्ये बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, जीटीबी नगरमधील पंजाब कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये असून पुढील काळात मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
घरासोबत आधुनिक सुविधा
या नव्या घरांसोबत रस्ते, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांना केवळ घरच नव्हे, तर सुरक्षित आणि दर्जेदार जीवनमानही मिळणार आहे.
म्हाडाची ही आगामी लॉटरी अनेक कुटुंबांसाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी ठरणार असून नागरिकांचे लक्ष आता फेब्रुवारीतील अधिकृत जाहिरातीकडे लागले आहे.

