(मुंबई)
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी संघटनात्मक पातळीवर निर्णायक हालचालींना सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगात सुरू असून, त्यासाठी महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीची जबाबदारीही तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
केरळ विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. केरळमध्ये भाजपसाठी परिस्थिती आव्हानात्मक मानली जाते. मात्र, संघटनकौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवासाठी ओळख असलेल्या विनोद तावडे यांनी यापूर्वी बिहारसह विविध राज्यांत प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे केरळसारख्या कठीण राज्याची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
तेलंगणासाठी आशिष शेलार यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती
मंत्री आणि मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांची तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांत शेलार यांनी प्रभावी रणनीती राबवत चांगली कामगिरी बजावली होती. संघटनबांधणी, प्रशासनावर पकड, आक्रमक राजकारण आणि मजबूत जनसंपर्क ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते.
दरम्यान, मुंबईतील भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडे बंगळुरू महापालिका निवडणुकांचे सह-प्रभारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे भाजपने देशपातळीवरील आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचे स्पष्ट होते.

