(रत्नागिरी)
सण-उत्सव, महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच VIP/VVIP व्यक्तींच्या दौऱ्यांदरम्यान राबविण्यात येणारा पोलीस बंदोबस्त अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘बंदोबस्त ॲप’ विकसित केले आहे. हे नाविन्यपूर्ण डिजिटल ॲप 07 नोव्हेंबर 2025 रोजी तयार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली नागरिक-केंद्रित पोलीसिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल उपक्रमांपैकी ‘बंदोबस्त ॲप’ हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
बंदोबस्त नियोजनात तंत्रज्ञानाची साथ
रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात येतो. या बंदोबस्ताची नेमणूक, उपस्थिती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील नियंत्रण अधिक सुसूत्र राहावे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट निरीक्षण करता यावे, या उद्देशाने हे AI-आधारित ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे.
या ॲपवरून थेट बंदोबस्त लावला जाणार आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणावरून पोलीस इकडे-तिकडे गेल्यास तात्काळ त्या अंमलदाराचे रिपोटिंग होणार आहे. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून पोलीस अंमलदार अन्य ठिकाणी गेल्यास त्याचा अलर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांना ॲपचे प्रात्यक्षिक दाखवले.
ॲपची कार्यपद्धती
‘बंदोबस्त ॲप’च्या माध्यमातून प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराला डिजिटल स्वरूपात बंदोबस्त पॉईंट आणि कर्तव्याची नेमणूक केली जाते. संबंधित अधिकारी ॲपवरून आपले कर्तव्यस्थळ पाहू शकतात आणि ऑनलाईन हजेरी नोंदवू शकतात. ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर अधिकारी किंवा अंमलदाराचे लाईव्ह जिओ-लोकेशन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसते. जर कोणी नेमून दिलेल्या बंदोबस्त पॉईंटच्या बाहेर गेला, तर तत्काळ अलर्ट संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त होतो. त्यामुळे बंदोबस्तावर प्रभावी आणि तत्काळ नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.
प्रशासकीय नियंत्रण
AI-आधारित ‘बंदोबस्त ॲप’चे संपूर्ण प्रशासकीय आणि ऑपरेशनल नियंत्रण पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्याकडे आहे. या व्यवस्थेमुळे बंदोबस्ताच्या संपूर्ण प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट निरीक्षण राहते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्तरावरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार ‘बंदोबस्त ॲप’चा वापर करत आहेत. सर्वांनी हे ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून नियमित वापर सुरू केला आहे.
ॲप वापरकर्त्यांची संख्या:
• सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी – रत्नागिरी जिल्हा
• पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) – रत्नागिरी
• पोलीस निरीक्षक – 17
• सहाय्यक पोलीस निरीक्षक – 21
• पोलीस उपनिरीक्षक – 67
• सहाय्यक पोलीस फौजदार – 118
• पोलीस हवालदार – 464
• पोलीस नाईक व कॉन्स्टेबल – 788
एकूण: 1,481 पोलीस अधिकारी व अंमलदार
आतापर्यंत या AI-आधारित ‘बंदोबस्त ॲप’च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात 27 महत्त्वाचे आणि अतिमहत्त्वाचे बंदोबस्त यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे बंदोबस्त अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा पोलीस यंत्रणा हायटेक केली आहे. बंदोबस्तावर ॲपद्वारे नजर ठेवण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच आणि अभिनव प्रयोग आहे. डिजिटल पोलीसिंगच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक सुरक्षिततेला नवी दिशा मिळत आहे.

