( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जयगड येथील राकेश जंगम खूनप्रकरणी तपासात झालेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाईची काठी उगारली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करून त्यांना रत्नागिरी जिल्हा नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, तपासात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, सोमवारी त्यावरील अंतिम अहवाल सादर होणार आहे. त्या आधारे संबंधितांवर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे.
राकेश जंगम हा गेल्या वर्षी जयगडमधून बेपत्ता झाला होता. तब्बल वर्षभर त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, बेपत्ता भक्ती मयेकरच्या शोधादरम्यान दूर्वास पाटील याने चौकशीत राकेश जंगमचा खून केल्याची कबुली दिली. मात्र, जंगम बेपत्ता झाल्यावेळी जयगड पोलिसांकडून योग्य तपास न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी याची गंभीर नोंद घेत अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्याकडे चौकशी सोपवली. चौकशीत निष्काळजीपणा उघड झाल्याने पाटील यांची बदली करण्यात आली. या बदल्या-पदबदलांच्या पार्श्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे जयगड पोलिस स्थानकाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
जयगड पोलिस ठाणे एका बाजूला असल्याने वर्षानुवर्षे या ठाण्याकडे जणू कुणाचेच लक्ष न्हवते. छोट्या प्रकरणांपुरते मर्यादित राहिलेले हे ठाणे खुनी दूर्वास पाटीलच्या रक्तरंजित कबुलीजबाबामुळे एकदम चर्चेत आले. एका मागून एक खून केल्याची कबुली देताच पोलिसांच्या ढिसाळ तपासाची सारी पोलखोल झाली. राकेश जंगम बेपत्ता होऊन वर्ष उलटले तरी जयगड पोलिसांना सुगावा लागला नाही, हीच सर्वात मोठी लाजीरवाणी बाब ठरली. दुसऱ्या बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीत मात्र राकेशचा खून झाल्याचे उघड झाले. थोडक्यात, पोलिसांच्या नाकाखाली गुन्हा होऊनही त्यांना साधा वाससुद्धा आला नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरू केली आणि लगेचच सहायक निरीक्षकांची बदली केली. आणखी दोन कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. यातून निष्काळजीपणाच्या धाग्यांनी विणलेला जयगड पोलिसांचा तपास आता जिल्हा प्रशासनाच्या निशाण्यावर आला आहे.

