(रत्नागिरी / वार्ताहर)
“रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयामुळेच माझ्या जीवनाला नवी दिशा मिळाली,” अशा भावनिक शब्दांत प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी वाचनालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी दोन लाख रुपयांची देणगी जाहीर करून वाचनालयाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. कद्रेकर यांनी सांगितले की, त्यांचे वडील नियमितपणे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी येत असत. त्याचवेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका शैक्षणिक जाहिरातीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्या जाहिरातीच्या आधारे त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवले आणि त्यातूनच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली.
“त्या काळात आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. वृत्तपत्र विकत घेण्याचीही परिस्थिती नव्हती. मात्र, वाचनालयामुळे वडिलांना ती जाहिरात वाचायला मिळाली आणि माझ्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्यामुळे या वाचनालयाचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही,” असे भावनिक उद्गार डॉ. कद्रेकर यांनी काढले.
यावेळी त्यांनी वाचनालयाच्या नवीन बांधकामासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन भावुक झाले. “डॉ. कद्रेकर यांचे योगदान आणि त्यांनी सांगितलेला प्रेरणादायी अनुभव वाचनालय कायम स्मरणात ठेवेल. मुक्त वाचन विभाग अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, “डॉ. कद्रेकर यांचे आशीर्वाद आणि सहकार्य वाचनालयाच्या रचनात्मक कामासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

