(मुंबई )
अवघ्या दोन वर्षांच्या अफ्सा या चिमुकलीच्या पोटात सूज दिसू लागल्यानंतर आईने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीत समोर आलेले निदान धक्कादायक होते. अफ्साला ‘हेपॅटोब्लास्टोमा’ हा गंभीर आणि दुर्मीळ यकृताचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. हा कर्करोग इतका वाढला होता की यकृतातील आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचला होता. पारंपरिक शस्त्रक्रिया अशा अवस्थेत शक्य नसतानाही, परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या डॉक्टरांनी धाडस करत भारतात पहिल्यांदाच बालरुग्णावर ‘एक्स-सिटू लिवर ऑटो-ट्रान्सप्लांट’ ही अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी केली.
सुरुवातीला साधी सूज वाटली होती, पण तपासण्या वाढत गेल्या आणि कर्करोगाचे गंभीर स्वरूप समोर आले. हा आजार लहान मुलांमध्ये आढळत असला, तरी अफ्साच्या बाबतीत कर्करोग यकृताच्या मध्यभागी होता आणि प्रमुख रक्तवाहिन्यांना चिकटला होता. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने गाठ काढणे जीवघेणे ठरू शकले असते. आधी केमोथेरपी देण्यात आली, ज्यामुळे ती गाठ काही प्रमाणात लहान झाली, मात्र शस्त्रक्रिया अजूनही शक्य नव्हती.
यकृत प्रत्यारोपण हा पर्याय उपलब्ध होता, पण इतक्या कमी वेळेत दाता मिळणे कठीण होते. शिवाय कर्करोगामुळे यकृतातील रक्तप्रवाह जवळजवळ बंद झाला होता. अखेर डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीचा पण एकमेव पर्याय निवडला, तो म्हणजे ‘एक्स-सिटू लिवर ऑटो-ट्रान्सप्लांट’.
या प्रक्रियेत अफ्साचे संपूर्ण यकृत शरीरातून बाहेर काढण्यात आले. ते सुमारे 4.5 तास थंड तापमानात सुरक्षित ठेवण्यात आले. या काळात डॉक्टरांनी यकृतातील 70 ते 80 टक्के कर्करोगग्रस्त भाग काढून टाकला, खराब झालेल्या रक्तवाहिन्यांची दुरुस्ती केली आणि उरलेला निरोगी भाग पुन्हा तिच्या शरीरात प्रत्यारोपित केला. म्हणजेच अफ्साचे स्वतःचेच निरोगी यकृत तिलाच परत बसवण्यात आले, अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.
सुमारे पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. अभिषेक माथूर यांनी केले. बालशल्यचिकित्सक, लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट आणि आयसीयू टीम अशा बहुवैद्यकीय तज्ज्ञांची मोठी टीम या प्रक्रियेत सहभागी होती. शस्त्रक्रियेदरम्यान खास ‘हायपोथर्मिक मशीन’चा वापर करण्यात आला, ज्यामुळे शरीराबाहेर असतानाही यकृताला आवश्यक रक्तपुरवठा मिळत राहिला आणि गुंतागुंत टाळता आली. हे मशीन चेन्नईतील एका कंपनीने विनामूल्य उपलब्ध करून दिल्यामुळे कुटुंबावरचा आर्थिक ताणही कमी झाला.
ही शस्त्रक्रिया केवळ अफ्सासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. भविष्यात गंभीर यकृत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अनेक बालरुग्णांसाठी ही पद्धत आशेचा किरण ठरू शकते, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तसेच गरीब कुटुंबातील मुलांना उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी अशा शस्त्रक्रिया विनामूल्य करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे मत डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी व्यक्त केले.

