(सिंधुदुर्ग)
“देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप बळकट करण्यासाठी विशाल परब यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विशाल परब यांची पक्षात पुन्हा घरवापसी झाली. या वेळी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत भाजपा कार्यालय घोषणांनी दणाणून गेले.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, “विशाल परब यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. सावंतवाडी मतदारसंघात महायुतीच्या जागा वाटपात दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले होते.”
तथापि, परब यांनी वारंवार विनंती करत आपण पुन्हा भाजपमध्ये काम करू इच्छित असल्याचं स्पष्ट केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षासाठी काम करायची माझी इच्छा आहे,” असे परब यांनी सांगितल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या विनंतीवर सकारात्मक प्रतिसाद देत पक्षश्रेष्ठींनी निलंबन मागे घेतलं आहे.
विशाल परब यांच्या घरवापसीनंतर त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग दिसून आला. या नव्या उमेदीमुळे कोकणात भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचा विश्वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला भाजप आमदार विक्रम पाचपुते, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रभाकर परब, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

