( बंगळूरू )
कर्नाटक राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी पदावर कार्यरत असलेले रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने ही तातडीची कारवाई केली. रामचंद्र राव हे सध्या डीजीपी (सिव्हिल राइट्स एन्फोर्समेंट) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.
सोमवारी सोशल मीडियावर काही व्हीडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या व्हीडीओंमध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील वर्तन करत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे व्हीडीओ समोर येताच प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राज्य सरकारने चौकशीपूर्वीच निलंबनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारची लेखी परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, या घटनेमुळे कर्नाटक पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.
दरम्यान, रामचंद्र राव यांनी आपल्यावरचे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी पूर्णपणे धक्क्यात आहे. हे सर्व व्हीडीओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात फेक व्हीडीओ तयार करणे सोपे झाले असून माझी बदनामी करण्यासाठी हे कटकारस्थान असू शकते.”
व्हीडीओ जुने असण्याची शक्यता?
व्हीडीओ जुने असू शकतात का, या प्रश्नावर १९९३ बॅचचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांनी सांगितले की, जर ते जुने असतील तर साधारण आठ वर्षांपूर्वीचे, म्हणजे बेलगावीमध्ये पोस्टिंग असतानाचे असू शकतात. मात्र त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केले की, या व्हीडीओंचा माझ्याशी काहीही संबंध नाही.
गृह मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न
प्रकरण समोर आल्यानंतर रामचंद्र राव यांनी कर्नाटकचे गृह मंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भेट होऊ शकली नाही. सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश
या वादावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “आज सकाळी मला या प्रकरणाची माहिती मिळाली. अधिकारी कितीही वरिष्ठ असला, तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. चौकशी केली जाईल आणि दोष आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत रामचंद्र राव?
डॉ. के. रामचंद्र राव हे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या त्यांच्याकडे पोलिस महासंचालक (डीजीपी) पद आहे. त्यांचा जन्म ७ मे १९६६ रोजी आंध्र प्रदेशात झाला. रामचंद्र राव हे उच्चशिक्षित आहेत, त्यांनी एम.एससी. आणि नंतर पीएचडी केली आहे.
अभ्यासानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि १९९३ मध्ये त्यांची आयपीएससाठी निवड झाली. ४ सप्टेंबर १९९४ रोजी त्यांची कर्नाटक केडरमध्ये नियुक्ती झाली. रामचंद्र राव हे १९९३ बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, त्यांची कारकीर्द अनेकदा वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत राहिली आहे. २०१४ मध्ये म्हैसूरजवळील येळवळ परिसरात झालेल्या एका रोख रक्कम जप्ती प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते.
केरळकडे जाणाऱ्या खासगी बसमधून २० लाख रुपये जप्त केल्याचा पोलिसांचा दावा होता, तर व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात २.२७ कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात राव यांनी कोणताही गैरप्रकार झाल्याचे नाकारले होते; मात्र, त्यावेळी छाप्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्यानेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
रान्या राव प्रकरणामुळे वादाला अधिक धार
रामचंद्र राव हे अभिनेत्री रान्या राव यांचे वडील असल्याने हे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. रान्या रावला मार्च २०२५ मध्ये दुबईहून परतताना गोल्ड स्मगलिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिच्याकडून १४.८ किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले होते, ज्यांची अंदाजे किंमत १२.५६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तपास यंत्रणांनी बंगळुरूतील लवेल रोडवरील तिच्या निवासस्थानी छापा टाकून मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त केली होती.
या पार्श्वभूमीवर रामचंद्र राव यांच्यावरील निलंबनाची कारवाई अधिक संवेदनशील मानली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता चौकशी अहवालाकडे लागले आहे.

