(मुंबई)
विधानसभेत सुरू असलेल्या कामकाजादरम्यान मोबाईलवर रमी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज, मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता, सिन्नरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोनवर संवाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केला; विरोधकांचा राजीनाम्याचा आग्रह
विधानसभेत कामकाज सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. गेले दोन दिवस हे प्रकरण गाजत असून, राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
फडणवीस म्हणाले – भूषणावह नाही…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी कोकाटेंच्या व्हिडिओविषयी नाराजी व्यक्त केली. जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचत असता, किंवा इतर काही वाचत असता तर ते ठिक आहे. पण रमी खेळणं हे काही बरोबर नाही. कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरणं दिलंय, त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही, अशा शब्दात फडणवीसांनी ठणकावलं.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं समजतं. या चर्चेनंतर माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर येथील दूध संघ कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाले, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे मंगळवारी सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नेमकी कोणती भूमिका मांडणार आणि संभाव्य राजकीय निर्णय घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे.

