(पुणे)
राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका काय असणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
पुण्यात महापालिकेच्या वतीने आयोजित तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर होत आहेत. आमच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीत महायुतीला यश मिळेल, असा मला विश्वास आहे.”
महायुतीची रणनीती स्पष्ट
महापालिका निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा-शिवसेनेची युती असेल. काही ठिकाणी तिन्ही पक्षांची (भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी) एकत्रित युती होईल, तर एखाद्या-दोन ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युतीही असेल.”
विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढतील, मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल. शिवसेना देखील शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल.”
मतदार याद्यांमधील त्रुटींवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “याद्यांमध्ये घोळ आहे, हे आम्ही मान्य करतो. मात्र त्यासाठी निवडणुका थांबवता येणार नाहीत. गेल्या २०-२५ वर्षांपासून निवडणुका लढवणाऱ्यांना माहिती आहे की, काही प्रमाणात घोळ असतोच. सध्या सुरू असलेल्या एसआयआरमुळे हा घोळ कमी होईल. निवडणूक आयोगाने मतदार याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकल्यास भविष्यात हा प्रश्न सुटू शकतो.”
मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास भाजपाला फटका बसेल का? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र आले, त्यांच्यासोबत काँग्रेस आली तरी भाजपाला कोणताही फटका बसणार नाही. मुंबईकरांनी महायुतीने केलेले विकासकाम आणि मराठी माणसाच्या हितासाठी घेतलेले निर्णय पाहिले आहेत. त्यामुळे मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील.”

