( चिपळूण )
चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या चिपळूण नगरपालिकेतील दहा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित पाच दिवसीय दशकपूर्ती कीर्तनमालेच्या सांगता समारंभात गौरव करण्यात आला. ह.भ.प. श्री आफळेबुवा यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
चिपळूण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील मनोहर काशिराम कांबळे, लक्ष्मण भागुराव जाधव, दयानंद बबन मोहिते, सुनील नारायण नेवाले, अनिल अनंत जाधव, उमेश बुद्धदास मोहिते, ओंकार श्रीकांत रामाणे, अनिल शिवराम खापरे, अमोल रमेश गमरे आणि दीपक तुकाराम कदम या कर्मचाऱ्यांना विशेष निमंत्रित करून कीर्तनमालेच्या सांगता कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने संस्थेचे विश्वस्त सदस्य सुनील सावंत यांच्या हस्ते डॉ. पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कीर्तनमाला उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य करणारे नवनिर्वाचित नगरसेवक निहार कोवळे व सौ. रसिका देवळेकर, कीर्तनात तालवाद्याची साथ देणारे ह.भ.प. संकेत भोळे यांचा आयोजक परिवाराचे देवेंद्र रेडीज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरवर्षी वृत्तपत्रांमधून कीर्तनमालेच्या वृत्तांकनासाठी योगदान देणाऱ्या सौ. विशाखा चितळे आणि शरद तांबे यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष समीर वासुदेव दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दशकपूर्तीचे औचित्य साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा सन्मान केल्याबद्दल स्वामी चैतन्य परिवाराचे विशेष कौतुक केले. गेल्या दहा वर्षांपासून चिपळूणवासीयांना ह.भ.प. आफळेबुवांच्या अभ्यासपूर्ण व चिंतनशील कीर्तनाचा लाभ मिळत असून, ही कीर्तनमाला नव्या पिढीला संस्कार देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
कीर्तनमालेच्या सांगता पुष्पात ह.भ.प. आफळेबुवांनी तरुण पिढीला भ्रष्टाचार आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा स्पष्ट संदेश दिला. पाचही दिवस पेशवाई काळातील ज्ञात-अज्ञात इतिहासाचे सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले. सांगतेनंतर सांस्कृतिक केंद्रातून बाहेर पडताना रसिक श्रोत्यांनी आयोजकांप्रती समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे समयोचित आणि नेटके सूत्रसंचालन विजय (नाना) परचुरे यांनी केले. विनामूल्य स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या कीर्तनमाला उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या दाते, संस्था आणि प्रसारमाध्यमांचे त्यांनी आभार मानले.

