(मुंबई)
साकीनाका परिसरातून समोर आलेल्या एका थरारक घटनेने मुंबई हादरली आहे. प्रेयसीसोबत संसार करण्यासाठी एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचत 6.70 लाख रुपयांची सुपारी देऊन तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाचा दीड वर्षांनी छडा लागला असून साकीनाका पोलिसांनी पतीसह चार जणांना अटक केली आहे.
14 ऑक्टोबर 2024 रोजी संघर्ष नगर परिसरात राहणाऱ्या नारंगी उर्फ गीता चौधरी (34) यांचा मृतदेह त्यांच्या घरातील किचनमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्या असल्याचे गृहीत धरत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली होती. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.
मात्र, मृत महिलेचे वडील भानाराम चौधरी यांना मुलीच्या मृत्यूबाबत सुरुवातीपासूनच संशय होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राजस्थानमध्ये तक्रार दाखल झाली. त्यानंतर दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी पती सखाराम चौधरी (36) याने यापूर्वीही दोनदा पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा अपघाताचा बनाव, तर दुसऱ्यांदा मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्याने मित्र शंकर डांगी याला 6.70 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानुसार बाबू उर्फ राघव गायरी आणि दिनेश गायरी यांच्या मदतीने 14 ऑक्टोबर 2024 रोजी गीता यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.
गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. जर पुन्हा शवविच्छेदन झाले नसते, तर हा गुन्हा कायमचा दडपला गेला असता, असे स्पष्ट झाले आहे. चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सखारामचे डिंपल नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तिच्यासोबत राहण्यासाठीच त्याने पत्नीचा अडथळा दूर करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे आरोपीला जेरबंद केले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सध्या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर मानवी नात्यांतील क्रौर्याचेही भयावह चित्र समोर आणणारी ठरली आहे.

