(मंडणगड / प्रतिनिधी)
तालुक्यातील ग्रामीण भागातील एका दोन वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या चुलत काकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.
मंडणगड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंडणगड पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानंतर पीडित चिमुरडीच्या संशयित काकाला रविवारी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेची माहिती सोमवारी जिल्हाभर पसरली. त्याबाबत तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागल्या असून, हे कृत्य करणाऱ्याला बचावाची संधी मिळू नये, यासाठी पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करुन अधिकाधिक पुरावे गोळा करावेत, अशी अपेक्षा केली जात आहे.

