(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालीच लढविण्यात येतील, असा स्पष्ट संदेश उद्धवसेनेचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिल्याने पक्षातील अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव–राऊत गटबाजीमुळे पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
सोमवारी चिपळूण येथील एका अतिथीगृहाच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीही उघडपणे व्यक्त केली. मात्र, चर्चेनंतर निवडणुका आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच लढवाव्यात, असा स्पष्ट आदेश पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती व्हावी, अशी सुरुवातीपासूनच पक्षाची इच्छा असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर परिषद निवडणुकीच्या काळात आमदार भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊत यांचे स्वतंत्र गट तयार झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले होते. त्याचा फटका थेट उद्धवसेनेला बसला. मात्र, आता उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनच घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याने पक्षातील मतभेद मिटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तथापि, या बैठकीचे निमंत्रण आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले नसल्याने ते बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक नेतृत्व ते स्वीकारणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता असून पुढील काही दिवसांत यावर स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणूक प्रचारात आपण स्वतः सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणाही विनायक राऊत यांनी यावेळी केली.

