(मंडणगड/ रत्नागिरी)
मंडणगड-महाड मार्गावर शेनाळे आतकोलफाटा येथे स्विफ्ट कार आणि एसटी बसची धडक होऊन अपघात झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात कारमधील अस्मित महेंद्र जाधव (२२) आणि रोहित राजेंद्र जाधव (२५, दोघेही रा. सडे जाधववाडी, ता. मंडणगड) हे जखमी झाले. याप्रकरणी रोहित राजेंद्र जाधव याच्याविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जाधव हा मारुती सुझुकी स्विफ्ट कार (एमएच ०४ एमझेड ४३२०) घेऊन मंडणगडहून महाडच्या दिशेने जात होता. १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास शेनाळे आतकोलफाटा परिसरात कार आली असता समोरून एसटी बस येत होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता कार अतिवेगाने, बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालविल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कारची समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक झाली. या धडकेत कारमधील अस्मित जाधव आणि रोहित जाधव यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
या घटनेची फिर्याद गजानन भारत गिरी (४०, रा. भारत बेकरी शेजारी, एसटी बसस्थानकासमोर, दापोली) यांनी दिली. त्यावरून रोहित राजेंद्र जाधव याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडला, याचा पुढील तपास मंडणगड पोलिसांकडून सुरू आहे.


