( मुंबई )
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात वैचारिक आघाडी झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांच्यासह चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल आणि पांडुरंग मिरगळ यांनी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला, याचे स्वागत आहे. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून सामाजिक न्यायाच्या व्यापक भूमिकेतून करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली असून, “ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागीदारी” ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. या भूमिकेला सर्व समाजातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. धनगर आणि ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यावर विशेष भर दिला जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली बारामतीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. धनगर, ओबीसी, मराठा आणि आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक झाली असून जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे या समाजांचा भाजप आणि फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसी आरक्षण कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू असून २७ टक्के आरक्षणावरही गदा येत आहे. शासन निर्णयांवर शासन निर्णय काढले जात आहेत, मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा कोणत्याच समाजाला मिळत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतंत्र पक्ष स्थापन करून समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याबद्दल राहुल गांधी यांचे त्यांनी आभार मानले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
दरम्यान, भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ३० नगरसेवक विजयी झाल्याबद्दल टिळक भवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, भिवंडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, प्रभारी राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस नूर अन्सारी, जावेद फारुखी, रमाकांत भोई यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भिवंडी महानगरपालिकेतील यशाबद्दल नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत, आगामी काळात लोकहिताच्या प्रश्नांसाठी ताकदीने काम करण्याचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

